बारामतीच्या वैद्यकीय महाविद्यालयात योग व ध्यान सत्राचे आयोजन

        


     आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त  बारामतीच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शरीरक्रिया विभागाच्या मार्फत वैद्यकीय विद्यार्थी, प्राध्यापक, नर्सिंग स्टाफ व कर्मचारी वृंद यांच्यासाठी योग व ध्यान विषयावर व्याख्यान व प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले. एकूण 150 विद्यार्थी व कर्मचारी वर्गाने या सत्राचा लाभ घेतला.  बारामतीतील प्रसिद्ध आयुर्वेद व योग तज्ञ डॉ निलेश महाजन  यांनी विद्यार्थ्यांना योग व ध्यान आणि त्याचा मानवी शरीरावर होणारा सकारात्मक परिणाम याच्या प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले व नेत्रचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ विवेक सहस्रबुद्धे जे गेले २४ वर्ष अनेक वैद्यकीय महाविद्यालयामध्ये योगाचे धडे देत आहेत त्यांनी योगाचे जीवनातील महत्व यावर संवाद साधला. 


      यशस्वी जीवनासाठी आपल्या मनाला नियंत्रीत करणे आवश्यक आहे. डोळ्यांना न दिसणारे पण मानवी जीवनाच्या सर्व निर्णयावर, क्रियांवर परिणाम करणारे असे मन नियंत्रित करण्यासाठी योग व ध्यान आवश्यक आहे. त्यासाठी क्रमाक्रमाने तज्ज्ञ योग शिक्षकाकडून अष्टांग योगसाधना करणे आवश्यक आहे. असे मत वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ चंद्रकांत म्हस्के यांनी व्यक्त केले


      मानवी शरीराचे अस्तित्व हे पंचाकोषात्मक असून प्रत्येक स्तर हा अधिक सुक्ष्मतर होत जातो. योगाच्या निरंतर अभ्यासाने शरीर, श्वासाच्या माध्यमातून  आपण या सुक्ष्मतर शरीराचा अनुभव घेतला तर या भौतिक जगामध्येही आपण आपल्या अस्तित्वाचा शोध घेऊ शकतो. यासाठी नियमित ध्यान करणे आवश्यक आहे. सततच्या तणावामुळे शरीरातील क्रियांचे असंतुलन हे आजारांना निमंत्रण देते, या क्रिया नियमित करण्यासाठी योगसाधना उपयोगी ठरते   असे मत डॉ निलेश महाजन यांनी यावेळी व्यक्त केले.


 

   शरीरक्रियाशास्त्राचा अभ्यास करताना असे लक्षात येते कि, योगाचा मानवी शरीरातील क्रियांवर सकारात्मक परिणाम पहावयास मिळतो, त्यामुळे अनेक आजारांवर प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक उपयोग होतो. याची माहिती विद्यार्थी दशेतच मिळावी यासाठी वैद्यकीय विद्यार्थी आणि इतरांसाठी या शिबिराचे आयोजन केल्याचे शरीरक्रिया विभागाचे प्रमुख डॉ अंजली शेटे यांनी सांगितले. 



   या कार्यक्रमामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ सारिका व्हराडे, योगशिक्षक सीमा गोडसे तसेच योगा रील स्पर्धेच्या विजेत्या विद्यार्थ्यांना डॉ निलेश महाजन यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास डॉ साठे, डॉ संतोष बोकरे, डॉ सौरभ मुथा, नितीन हाटे, श्री कोकरे उपस्थित होते.    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ प्रतिमा खटके यांनी केले.