आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मोफत जलनेती प्रशिक्षण शिबीर संपन्न
डॉ निलेश महाजन यांचे मार्गदर्शन
बारामतीतील जीवनविद्या योग आयुर्वेद फाउंडेशन नक्षत्र गार्डन येथे येणाऱ्या योग दिनानिमित्त जलनेती प्राशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. योगाचार्य डॉ निलेश महाजन आणि डॉ भक्ती महाजन यांनी ७० साधकांना प्रत्यक्ष जलनेतीचे शास्त्रोक्त प्रशिक्षण दिले. योगासन आणि प्राणायाम सोबत शरीराची शुद्धी करण्यासाठी हठयोगामध्ये षटकर्माचा उल्लेख केला आहे. या शुद्धीक्रियांद्वारे शरीराच्या अंतर्गत विविध भागाची आपण शुद्धता करू शकतो. त्यातील जलनेती हि सर्वात सोपी आणि सहज करण्यासाखी क्रिया आहे. केवळ अज्ञान आणि भीती यामुळे सामान्य व्यक्ती या क्रिया करायला घाबरत असतो पण त्याचे प्रत्यक्ष ज्ञान मिळाले आणि योग्य मार्गदर्शन मिळाले तर आपण हे सहज करू शकतो. भारतीय पारंपरिक ज्ञानाचा हा खजिना आहे केवळ आपल्या अज्ञानामुळे आणि दुर्लक्षामुळे लुप्त होऊ नये म्हणून आम्ही अशा प्रकारच्या शिबिरांचे आयोजन करीत आहोत. जलनेती क्रियेमुळे नाकाची आणि श्वसन मार्गाची शुद्धता होते. नियमित जलनेती अभ्यासाने वारंवार होणारी सर्दी, मायग्रेन, डोळ्याचे आजार, दमा , दीर्घकालीन खोकला यासारख्या आजारांवर जलनेतीचा चांगला फायदा होतो. असे योग महाविद्यालयाच्या संचालिका डॉ भक्ती महाजन यांनी सांगितले.