योग महाविद्यालयाच्या योगपटूला राष्ट्रीय योगासन स्पर्धेत सुवर्ण

 योग महाविद्यालयाच्या योगपटूला राष्ट्रीय योगासन स्पर्धेत सुवर्ण 

बारामतीतील योग महाविद्यालयातील रोहित चव्हाण याची संगमनेर येथे झालेल्या 6 व्या राष्ट्रीय योगासना स्पोर्ट्स चॅम्पियनशिप २०२५-२०२६ मध्ये प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदक पटकावले आहे. यामुळे गुजरात मध्ये होणाऱ्या पहिल्या जागतिक योगासन स्पर्धेसाठी भारतीय संघामध्ये त्याची निवड झाली आहे.या स्पर्धेमध्ये भूमासन, गर्भासन, ओंकारसन, पश्चिमोत्तानासन, हलासन इ. प्रकारची प्रगत आसने या स्पर्धेसाठी ठेवण्यात आली होती.  योग महाविद्यालय, बारामती येथे रोहित योगशास्त्रामध्ये पदव्युत्तर (एम. ए) शिक्षण घेत आहे. यापूर्वीही अनेक योगासन स्पर्धांमध्ये त्याने यश संपादन केले आहे. योगासन स्पर्धेसाठी त्याला योग महाविद्यालय बारामतीचे संस्थापक डॉ. निलेश महाजन, डॉ. भक्ती महाजन, प्रा प्राजक्ता देशपांडे, सचिन रणमोडे  व शिवाजी विद्यापीठातील सौ. विणा मालडीकर, सौ. प्रीती चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.




योग शिक्षकांना परदेशातील संधी यावर कार्यशाळा संपन्न*


योग शिक्षकांना परदेशातील संधी यावर कार्यशाळा संपन्न*

बारामतीतील योग महाविद्यालय बारामती तर्फे योग शिक्षकांना परदेशातील विविध संधी याविषयी एक दिवसीय ऑनलाईन कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करण्यात आले. सध्या उझबेकिस्थान येथे लाल बहादूर शास्त्री संस्कृतीक केंद्र येथे कार्यरत असलेले शरद मुंडे व योगाचार्य डॉ निलेश महाजन यांनी सहभागी ७७ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, तामिळनाडू , गुजरात येथील योग शिक्षक सहभागी झाले होते.  भारत सरकारच्या  भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेतर्फे योग शिक्षकांना परदेशामध्ये योग शिक्षणासाठी पाठविले जाते, त्याची माहिती अनेकांना नसते त्यामुळे योग्यता असूनही त्यांना हि संधी मिळत नाही, त्यासाठी एक माहितीपर कार्यशाळेचे आयोजन केल्याचे डॉ निलेश महाजन यांनी सांगितले. 

          भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेतर्फे योग शिक्षक म्हणून परदेशात कार्य करणे हि अभिमानस्पद गोष्ट आहे. योग शास्त्राचा उगम भारतामध्ये झाला आहे. त्यामुळे भारतीयांकडून योग शिकण्यासाठी परदेशातील नागरिक उत्सुक असतात. त्यांना आपण या माध्यमातून आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख करून देतो. त्यामुळे सर्व पात्र योग शिक्षकांनी यामध्ये सहभागी व्हावे असे प्रतिपादन उझबेकिस्थान येथील योगशिक्षक शरद मुंडे यांनी केले. योग शिक्षक म्हणून निवड होण्यासाठी अर्ज कसा भरावा, शैक्षणिकी पात्रता काय आहे, मुलाखतीसाठी तयारी कशी करावी, अभ्यास कसा करावा या आणि  अनेक विषयांवर यामध्ये माहिती देण्यात आली. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ भक्ती महाजन, सचिन रणमोडे यांनी सहकार्य केले.




योग महाविद्यालया तर्फे स्वामी विवेकानंद जयंती निमित्त ध्यानयोग सत्राचे आयोजन

 योग महाविद्यालया तर्फे स्वामी विवेकानंद जयंती निमित्त ध्यानयोग सत्राचे आयोजन 

स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त योग महाविद्यालय बारामती मध्ये मोफत ध्यानयोग सत्राचे व योगाचार्य डॉ निलेश महाजन यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. योगाचार्य डॉ निलेश महाजन यांनी प्राणधारणा,मंत्र ध्यान आणि अंतर त्राटक यांच्या साहाय्याने उपस्थितांकडून ध्यानाचे प्रात्यक्षिक करून घेतले.


स्वामी विवेकानंद यांच्याकडे असीम दूरदृष्टी होती, त्यांनी युवांना कसे वागावे, कसे स्वतःला विकसित करायचे असे अनेक मुद्दे संगीतलेले आहेत. आजच्या युवाशक्ती ने स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचे अनुकरण केल्यास व्यक्तिमत्त्वामध्ये आमूलाग्र बदल होऊन त्यांच्या हातून महान कार्य घडू शकते  ऋषीमुनींनी त्यांच्या अपार ध्यान शक्तीच्या माध्यमातून हे ज्ञान आपल्या पर्यंत पोहचवले आहे.मन हे चंचल असते ,त्यावर नियंत्रण मिळवणे आणि त्याला आपला मित्र करून घेणे हे यशस्वी जीवनासाठी आवश्यक आहे. असे डॉ निलेश महाजन यांनी नमूद केले.  
आजच्या युवकांनी स्वामी विवेकानंद व मातोश्री जिजाऊ यांच्या विचारांना आदर्श मानून जीवनाला, समाजाला दिशा द्यावी. आपली संस्कृती ही आदर्श आहे. स्वामीजींच्या विचारांनी भारतीय संस्कृती ची ओळख जगाला करून दिली, त्यांचे धर्म, प्रार्थना आणि ज्ञान यांचे विवेचन त्यांनी जगासमोर योग्य प्रकारे मांडले.आजचे युवक हे उद्याचा देश घडवणार आहेत ,त्यामुळे स्वामीजींनी युवकांना सांगितलेल्या  व्यक्तिमत्व विकासाच्या विचारांचा अवलंब केला पाहिजे , आणि त्यांना अपेक्षित युवक होऊन स्वतःला ,समाजाला व  देशाला दिशा द्यावी असे मत डॉ भक्ती महाजन यांनी सांगितले.

 योग महाविद्यालयाचे डॉ श्वेता जाधव यांनी प्रास्ताविक व सूत्र संचालन केले तसेच कार्यक्रम यश्वी करण्यासाठी सचिन रणमोडे, हर्षदा मईड यांनी सहकार्य केले.





शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील प्रथम वर्ष आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना डॉ निलेश महाजन यांनी केले अष्टांग योगाचे मार्गदर्शन

शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील प्रथम वर्ष आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना डॉ निलेश महाजन यांनी केले अष्टांग योगाचे मार्गदर्शन 


बारामती येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयामध्ये शैक्षणिक सत्र २०२५-२६ च्या आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांची नवीन बॅच नुकतीच दाखल झालेली आहे. नवीन विद्यार्थ्यांमध्ये आयुर्वेदाची ओळख व्हावी, पुढे येणाऱ्या अभ्यासक्रमाची ओळख व्हावी या दृष्टीने भारतीय औषधी पद्धती राष्ट्रीय परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली  कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमांतर्गत 'शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अष्टांग योगाची उपयुक्तता' या विषयावर बारामतीतील प्रसिद्ध डॉ निलेश महाजन यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. 
 मानवी शरीराचे अस्तित्व केवळ स्थूल नसून सूक्ष्म स्तरावर देखील आहे. परंतु या सुक्ष्म स्तरावरील शरीराचे अनुभूती करण्यासाठी योगसाधना आवश्यक असते. अष्टांग योग साधना आपल्याला स्थूल शरीराची तसेच इंद्रिय, श्वास, मन आणि आत्मा अशा सुक्ष्म शरीराची अनुभूती करून देते. त्यासाठी यम , नियम ,आसने, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या अष्टांगांचा नियमित अभ्यास करणे आवश्यक आहे. सूक्ष्म शरीरातील बदलच आपल्या स्थूल शरीराचे कार्य ठरवत असतात. त्यामुळे शरीर आणि मनाच्या विकासासाठी योगसाधना विद्यार्थी दशेतच आत्मसाद करावी. असे मत डॉ निलेश महाजन यांनी यावेळी व्यक्त केले.    

दैनंदिन दिनक्रमामध्ये योगासने , प्राणायाम कोणता करावा , किती प्रमाणात करावा . त्यांचे होणारे फायदे याची माहिती देण्यात आली. प्राणायामाची पूर्वतयारी, प्रत्याहार आणि ध्यान याचे प्रात्यक्षिक करून घेण्यात आले. 

       या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अनिल काळे सर,  स्वस्थवृत्त विभागाच्या विभाग प्रमुख डॉ अर्चना इंचेकर मॅडम, डॉ सुरज भुंजे, डॉ प्रियंका यांनी सहकार्य केले. 

बारामती नगरपालिकेच्या योगासन प्राणायाम प्रशिक्षण शिबिराची सांगता

बारामती नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे प्रतिभा महिला प्रशिक्षण योजना २०२५-२०२६ अंतर्गत महिलांसाठी गेल्या दोन महिन्यांपासून चालू असलेल्या मोफत योगासन प्राणयाम प्रशिक्षण शिबिराचा समारोप करण्यात आला. समारोप प्रसंगी नगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण अधिकारी सौ सोनाली राठोड, सहय्यक सौ स्वाती सोनावणे, तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते योग प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिलांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. एकूण १०० महिलांनी या प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभग नोंदविला. बारामतीतील जीवनविद्या योग आयुर्वेद फौंडेशन च्या माध्यामतून सदर शिबिराला डॉ निलेश महाजन व डॉ भक्ती महाजन यांनी प्रशिक्षण दिले. 

सदर शिबिरामध्ये योगासने , प्राणायाम , धारणा , ध्यान, सूर्यनमस्कार आणि त्याचे विविध प्रकार यांचे  प्रशिक्षण शास्त्रोक्त प्रशिक्षण देण्यात आले. 

संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याची धुरा घरातील स्त्रीवर असते, त्यामुळे महिलांनी स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्यासाठी योगसाधना करणे आवश्यक आहे. या योग शिबिराचाही आरोग्याच्या दृष्टिकोनातून अनेक महिलांना लाभ होत आहे. मुख्याधिकारी श्री पंकज भुसे यांच्या माध्यामतून बारामती नगरपालिकेतर्फे महिलांना सक्षम करण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. पुढेही आरी वर्क, पाककला असे अनेक उपक्रम सुरु आहे. तरी महिलांनी याचा लाभ घ्यावा. असे मत महिला व बाल कल्याण अधिकारी सौ सोनाली राठोड यांनी व्यक्त केले. 

  नियमित योग केल्याने शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते, स्नायूंची कार्यक्षमता वाढते, मन प्रसन्न होते त्यामुळे महिलांनी नियमीत योग करावा. महिला या संपूर्ण कुटुंब व्यवस्थापन करीत असतात,त्यासाठी त्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे हे ही महत्वाचे आहे. नियमित योग केल्याने मासिक पाळीच्या तक्रारी, हार्मोन चे असंतुलन, शारीरिक थकवा कमी होऊन आरोग्य सुधारते असे मत शिबिराच्या प्रमुख मार्गदर्शिका डॉ भक्ती महाजन यांनी व्यक्त केले.

 याशिबिरा दरम्यान तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, महिला व बाल कल्याण विभागाच्या प्रमुख सोनाली राठोड सौ स्वाती सोनावणे यांनी भेट दिली.

शिबीर यशस्वी करण्यासाठी नगरपालिकेच्या  स्वाती सोनावणे, योग महाविद्यालयाचे सचिन रणमोडे,डॉ श्वेता जाधव, अश्विनी वायसे, नंदिनी खोमणे यांनी सहकार्य केले.




    

गत २५ वर्षापासून आयुर्वेदाशी नाळ जोडलेला चरक आयुर्वेद ग्रुप :वैद्य निलेश महाजन


बारामती दि २३ : केंद्र सरकार ने आयोजित केलेल्या राष्ट्रीय आयुर्वद दिनाचे औचित्य साधून दि १७ ते २३ सप्टेंबर २०२५ या कालावधी मध्ये डॉ भोइटेज चरक आयुर्वेद, सातारा यांच्या तर्फे चरक आयुर्वेद च्या सर्व शाखांमध्ये आयुर्वेद सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये निबंध स्पर्धा, लांब केश स्पर्धा, चित्रकला स्पर्धा  अशा विविध स्पर्धा तसेच आरोग्य कीर्तन उपक्रमाचे आयोजन केले गेले होते.  त्या निमित्ताने बारामती शाखे मध्ये घेतलेल्या विविध स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षिसे वितरण समारंभ बारामतीतील प्रसिद्ध योग व आयुर्वेद तज्ञ वैद्य निलेश महाजन , वैद्य भक्ती महाजन,वैद्य सारिका अष्टेकर यांच्या उपस्थिती मध्ये पार पडला, सर्व स्पर्धकांना चरक आयुर्वेदच्या वतीने प्रशस्तिपत्रक , पारितोषिक व भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले. 

आयुर्वेद हे आपल्या आयुष्यासाठी आवश्यक असे शास्त्र आहे. जसे आपण नवीन गाडी घेतो तेव्हा त्यासोबत एक माहिती पत्रक देतात , गाडी उत्तम रीतीने चालण्यासाठी काय गोष्टी करणे गरजेच्या आहेत, त्या कधी कराव्या , कशा कराव्या याबद्दलची सविस्तर माहिती त्यामध्ये असते. तसेच मनुष्य जीवनाचे आयुर्वेद हे माहिती पत्रक आहे. दीर्घकाल निरोगी राहून आपल्या चारही पुरुषार्थांची प्राप्ती कशी करावी यासाठीचे हे शास्त्र आहे. केवळ उपचारच नाही तर आपण आजारी पडू नये यासाठीचे नियम यामध्ये वर्णन केले आहेत. असे वैद्य निलेश महाजन यांनी सांगितले. चरक आयुर्वेदाच्या माध्यमातून लहान मुलामध्ये तसेच समाजामध्ये आयुर्वेद डीनच्या निमित्ताने घेतलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. यामुळे सामान्य जन आयुर्वेद चिकित्सा पद्धतीच्या जवळ येतील, त्याबद्दल चे गैरसमज दूर व्हयला मदत होणार आहे. त्यामुळे चरक आयुर्वेदाच्या बारामती शाखेच्या संचालक वैद्य प्रिया भोईटे व त्यांच्या पूर्ण टीम चे मनापासून अभिनंदन. 

या वेळी इतर प्रमुख पाहुण्यांनी आणि स्पर्धकांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले, लोकांना दर्जेदार आयुर्वेद औषधें मिळण्यासाठी चरक ग्रुप नेहमी प्रयत्न करत असतो असे प्रतिपादन वैद्यांनी केले , या वेळी चरक आयुर्वेद बारामती टीम मधील वैद्य प्रिया भोईटे ,वैद्य विक्रांत इंगळे ,वैद्य शिवानी गाडे तसेच वैद्य ऐश्वर्या शिंदे, व्यवस्थापक किशोर सावंत उपस्थित होते. अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली. 

आयुर्वेद सप्ताहातील  विजेत्या स्पर्धकांची नावे पुढील प्रमाणे, निबंध लेखन स्पर्धा,- सौ गायत्री खिलारे (प्रथम क्रमांक)   डॉ चैतन्य कुलकर्णी (द्वितीय क्रमांक ), चित्रकला स्पर्धा- लहान गट- रुचिता मते (प्रथम क्रमांक), आयुष कदम (द्वितीय क्रमांक) , मोठा गट-तन्मयी झुरुंगे(प्रथम क्रमांक),  करिष्मा ताडे (द्वितीय क्रमांक) ,  लांब केश संभार स्पर्धा  - सौ प्रज्ञा शेटे(प्रथम क्रमांक),  सौ वर्षा बालगुडे (द्वितीय क्रमांक )