योग महाविद्यालयाच्या योगपटूला राष्ट्रीय योगासन स्पर्धेत सुवर्ण

 योग महाविद्यालयाच्या योगपटूला राष्ट्रीय योगासन स्पर्धेत सुवर्ण 

बारामतीतील योग महाविद्यालयातील रोहित चव्हाण याची संगमनेर येथे झालेल्या 6 व्या राष्ट्रीय योगासना स्पोर्ट्स चॅम्पियनशिप २०२५-२०२६ मध्ये प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदक पटकावले आहे. यामुळे गुजरात मध्ये होणाऱ्या पहिल्या जागतिक योगासन स्पर्धेसाठी भारतीय संघामध्ये त्याची निवड झाली आहे.या स्पर्धेमध्ये भूमासन, गर्भासन, ओंकारसन, पश्चिमोत्तानासन, हलासन इ. प्रकारची प्रगत आसने या स्पर्धेसाठी ठेवण्यात आली होती.  योग महाविद्यालय, बारामती येथे रोहित योगशास्त्रामध्ये पदव्युत्तर (एम. ए) शिक्षण घेत आहे. यापूर्वीही अनेक योगासन स्पर्धांमध्ये त्याने यश संपादन केले आहे. योगासन स्पर्धेसाठी त्याला योग महाविद्यालय बारामतीचे संस्थापक डॉ. निलेश महाजन, डॉ. भक्ती महाजन, प्रा प्राजक्ता देशपांडे, सचिन रणमोडे  व शिवाजी विद्यापीठातील सौ. विणा मालडीकर, सौ. प्रीती चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.




योग शिक्षकांना परदेशातील संधी यावर कार्यशाळा संपन्न*


योग शिक्षकांना परदेशातील संधी यावर कार्यशाळा संपन्न*

बारामतीतील योग महाविद्यालय बारामती तर्फे योग शिक्षकांना परदेशातील विविध संधी याविषयी एक दिवसीय ऑनलाईन कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करण्यात आले. सध्या उझबेकिस्थान येथे लाल बहादूर शास्त्री संस्कृतीक केंद्र येथे कार्यरत असलेले शरद मुंडे व योगाचार्य डॉ निलेश महाजन यांनी सहभागी ७७ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, तामिळनाडू , गुजरात येथील योग शिक्षक सहभागी झाले होते.  भारत सरकारच्या  भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेतर्फे योग शिक्षकांना परदेशामध्ये योग शिक्षणासाठी पाठविले जाते, त्याची माहिती अनेकांना नसते त्यामुळे योग्यता असूनही त्यांना हि संधी मिळत नाही, त्यासाठी एक माहितीपर कार्यशाळेचे आयोजन केल्याचे डॉ निलेश महाजन यांनी सांगितले. 

          भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेतर्फे योग शिक्षक म्हणून परदेशात कार्य करणे हि अभिमानस्पद गोष्ट आहे. योग शास्त्राचा उगम भारतामध्ये झाला आहे. त्यामुळे भारतीयांकडून योग शिकण्यासाठी परदेशातील नागरिक उत्सुक असतात. त्यांना आपण या माध्यमातून आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख करून देतो. त्यामुळे सर्व पात्र योग शिक्षकांनी यामध्ये सहभागी व्हावे असे प्रतिपादन उझबेकिस्थान येथील योगशिक्षक शरद मुंडे यांनी केले. योग शिक्षक म्हणून निवड होण्यासाठी अर्ज कसा भरावा, शैक्षणिकी पात्रता काय आहे, मुलाखतीसाठी तयारी कशी करावी, अभ्यास कसा करावा या आणि  अनेक विषयांवर यामध्ये माहिती देण्यात आली. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ भक्ती महाजन, सचिन रणमोडे यांनी सहकार्य केले.




योग महाविद्यालया तर्फे स्वामी विवेकानंद जयंती निमित्त ध्यानयोग सत्राचे आयोजन

 योग महाविद्यालया तर्फे स्वामी विवेकानंद जयंती निमित्त ध्यानयोग सत्राचे आयोजन 

स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त योग महाविद्यालय बारामती मध्ये मोफत ध्यानयोग सत्राचे व योगाचार्य डॉ निलेश महाजन यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. योगाचार्य डॉ निलेश महाजन यांनी प्राणधारणा,मंत्र ध्यान आणि अंतर त्राटक यांच्या साहाय्याने उपस्थितांकडून ध्यानाचे प्रात्यक्षिक करून घेतले.


स्वामी विवेकानंद यांच्याकडे असीम दूरदृष्टी होती, त्यांनी युवांना कसे वागावे, कसे स्वतःला विकसित करायचे असे अनेक मुद्दे संगीतलेले आहेत. आजच्या युवाशक्ती ने स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचे अनुकरण केल्यास व्यक्तिमत्त्वामध्ये आमूलाग्र बदल होऊन त्यांच्या हातून महान कार्य घडू शकते  ऋषीमुनींनी त्यांच्या अपार ध्यान शक्तीच्या माध्यमातून हे ज्ञान आपल्या पर्यंत पोहचवले आहे.मन हे चंचल असते ,त्यावर नियंत्रण मिळवणे आणि त्याला आपला मित्र करून घेणे हे यशस्वी जीवनासाठी आवश्यक आहे. असे डॉ निलेश महाजन यांनी नमूद केले.  
आजच्या युवकांनी स्वामी विवेकानंद व मातोश्री जिजाऊ यांच्या विचारांना आदर्श मानून जीवनाला, समाजाला दिशा द्यावी. आपली संस्कृती ही आदर्श आहे. स्वामीजींच्या विचारांनी भारतीय संस्कृती ची ओळख जगाला करून दिली, त्यांचे धर्म, प्रार्थना आणि ज्ञान यांचे विवेचन त्यांनी जगासमोर योग्य प्रकारे मांडले.आजचे युवक हे उद्याचा देश घडवणार आहेत ,त्यामुळे स्वामीजींनी युवकांना सांगितलेल्या  व्यक्तिमत्व विकासाच्या विचारांचा अवलंब केला पाहिजे , आणि त्यांना अपेक्षित युवक होऊन स्वतःला ,समाजाला व  देशाला दिशा द्यावी असे मत डॉ भक्ती महाजन यांनी सांगितले.

 योग महाविद्यालयाचे डॉ श्वेता जाधव यांनी प्रास्ताविक व सूत्र संचालन केले तसेच कार्यक्रम यश्वी करण्यासाठी सचिन रणमोडे, हर्षदा मईड यांनी सहकार्य केले.