शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील प्रथम वर्ष आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना डॉ निलेश महाजन यांनी केले अष्टांग योगाचे मार्गदर्शन

शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील प्रथम वर्ष आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना डॉ निलेश महाजन यांनी केले अष्टांग योगाचे मार्गदर्शन 


बारामती येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयामध्ये शैक्षणिक सत्र २०२५-२६ च्या आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांची नवीन बॅच नुकतीच दाखल झालेली आहे. नवीन विद्यार्थ्यांमध्ये आयुर्वेदाची ओळख व्हावी, पुढे येणाऱ्या अभ्यासक्रमाची ओळख व्हावी या दृष्टीने भारतीय औषधी पद्धती राष्ट्रीय परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली  कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमांतर्गत 'शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अष्टांग योगाची उपयुक्तता' या विषयावर बारामतीतील प्रसिद्ध डॉ निलेश महाजन यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. 
 मानवी शरीराचे अस्तित्व केवळ स्थूल नसून सूक्ष्म स्तरावर देखील आहे. परंतु या सुक्ष्म स्तरावरील शरीराचे अनुभूती करण्यासाठी योगसाधना आवश्यक असते. अष्टांग योग साधना आपल्याला स्थूल शरीराची तसेच इंद्रिय, श्वास, मन आणि आत्मा अशा सुक्ष्म शरीराची अनुभूती करून देते. त्यासाठी यम , नियम ,आसने, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या अष्टांगांचा नियमित अभ्यास करणे आवश्यक आहे. सूक्ष्म शरीरातील बदलच आपल्या स्थूल शरीराचे कार्य ठरवत असतात. त्यामुळे शरीर आणि मनाच्या विकासासाठी योगसाधना विद्यार्थी दशेतच आत्मसाद करावी. असे मत डॉ निलेश महाजन यांनी यावेळी व्यक्त केले.    

दैनंदिन दिनक्रमामध्ये योगासने , प्राणायाम कोणता करावा , किती प्रमाणात करावा . त्यांचे होणारे फायदे याची माहिती देण्यात आली. प्राणायामाची पूर्वतयारी, प्रत्याहार आणि ध्यान याचे प्रात्यक्षिक करून घेण्यात आले. 

       या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अनिल काळे सर,  स्वस्थवृत्त विभागाच्या विभाग प्रमुख डॉ अर्चना इंचेकर मॅडम, डॉ सुरज भुंजे, डॉ प्रियंका यांनी सहकार्य केले.