बारामती नगरपालिकेच्या योग शिबिराचा समारोप
योगविद्या वाचस्पती डॉ निलेश महाजन व डॉ भक्ती महाजन यांचे मार्गदर्शन
बारामती नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे प्रतिभा महिला प्रशिक्षण योजना 2024-25 अंतर्गत गेल्या दोन महिन्यांपासून महिलांसाठी सकाळी 6.30 ते 7.30 वाजेपर्यंत मोफत योगासन प्राणायाम शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बारामतीतील प्रसिद्ध आयुर्वेद व योगोपचार तज्ञ डॉ निलेश महाजन व डॉ भक्ती महाजन यांनी महिलांना मोफत योगाचे धडे दिले. नागरपालिकेतर्फे नाव नोंदणी केलेल्या 65 आणि इतर 30 अशा 95 महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला. तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले यांच्या हस्ते योग प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिलांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
बारामती नगरपालिकेतर्फे महीलांसाठी नावीन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात येते, या योग शिबिराचाही आरोग्याच्या दृष्टिकोनातून अनेक महिलांना लाभ होत आहे. नियमित योग केल्याने शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते, स्नायूंची कार्यक्षमता वाढते, मन प्रसन्न होते त्यामुळे महिलांनी नियमीत योग करावा. असे मत मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी व्यक्त केले.
आरोग्य ही काळाची गरज आहे, योगामुळे सर्वांगीण आरोग्याचा विकास होतो. कोणतीही गोष्ट हातातून गेल्यानंतर आपल्याला त्याची किंमत कळते. त्यामुळे आरोग्य हातातून जाण्यापूर्वीच आरोग्यासाठी चांगल्या सवयी मध्ये स्वतःला गुंतवावे. असे मत महेश चावले यांनी व्यक्त केले.
धावपळीच्या युगात आजच्या महिला या संपूर्ण कुटुंब व्यवस्थापन करीत असतात,त्यासाठी त्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे हे ही महत्वाचे आहे. नियमित योग केल्याने मासिक पाळीच्या तक्रारी, हार्मोन चे असंतुलन, शारीरिक थकवा कमी होऊन आरोग्य सुधारते असे मत शिबिराच्या प्रमुख मार्गदर्शिका डॉ भक्ती महाजन यांनी व्यक्त केले.
याशिबिरा दरम्यान तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, महिला व बाल कल्याण विभागाच्या प्रमुख सोनाली राठोड यांनी भेट दिली.
शिबीर यशस्वी करण्यासाठी नगरपालिकेच्या कविता खरात, स्वाती सोनावणे, योग महाविद्यालयाचे विद्यार्थी नंदिनी खोमणे, डॉ श्वेता जाधव, अश्विनी वायसे, सचिन रणमोडे यांनी सहकार्य केले.